Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Tuesday, 1 August 2017

गूड जॉब आया!

सध्या घरात अभ्यासाचं वातावरण आहे. आणि अभ्यास नीट केला की miss 'सायली' (smiley) देतात.

आणि अभ्यासदेखील किती अवघड: sleeping lines, up-down up-down. Miss चा लक्ष असतं हां! 'Crooked line' आलेली अजिबात चालत नाही!


आणि मग "good job" केला की आयाला मिळतो 'smiley'!

महिका स्वतःच Miss आहे आणि आमची 'शाळा' घेते. पण ह्या छोटुकलीच्या शाळेत आमच्या लहानपणच्या खऱ्या शाळेपेक्षा मज्जा येते. जे तेव्हा शिकलो नाही, अथवा शिकलेले आठवत नाही ते ह्या शाळेत करता येते!

थँक यू Miss !

Tuesday, 14 March 2017

आया, तू किती छान जेवण करतेस...

हे उद्गार होते महिकाचे परवा मी पुरणपोळी बनवताना. आणि पुढे हेदेखील म्हणाली, "मलापण तुझ्यासारखं जेवण करायचंय!"

खरं सांगू का? मी किंचित गहिवरले... पण ह्याकरता नव्हे की खरंच माझे जेवण उत्कृष्ट झाले आणि तिला ते कळले!

मी ऑफिस सांभाळून जमेल तसे सगळे सण-वार करते. घरात दररोज पूजा नाही होत. पण सणासुदीला आवर्जून होते, सगळे सण अगदी कणा-रांगोळी काढणे इथपासून, त्या त्या दिवशी पक्वान्न बनवून नैवेद्य दाखवून सर्व जमवते. बऱ्याच वेळेस दमछाक होते. कंटाळा येतो, दमून जाते. वैताग येतो सगळे रीतिरिवाज करता करता.

पण त्या दिवशी महिका जे म्हणाली त्यामुळे एक लक्षात आलं की हे सर्व कुठेतरी "note down" होतंय नकळत. मुद्दाम बोलून न दाखवता आपले संस्कार रुजत आहेत. आणि आपल्या मुलीला आपल्यासारख्या गोष्टी कराव्याशा वाटतात, ह्यातच सगळे मिळाले.

कित्येक वेळेस मला सांगतात लोकं, "अगं काही इतका घाट घालत बसायचं नाही. सरळ बाहेरून ऑर्डर करायचं. हल्ली सगळं मिळतं." खरं आहे, मिळतं. पण तेव्हा मुलांकडून हे शब्द ऐकायला नाही मिळणार.

ज्यांना घरी करायला जमत नाही अथवा आवडत नाही त्यांच्याबद्दल माझे काही वाईट मत नाही, किंवा राग देखील नाही. मी आपलं स्वतःपुरतं सांगते. जितके जमेल तितके करेन. जेव्हा अवघड जाईल, तेव्हा मीदेखील बाहेरून आणेन. पण आत्ता जमतंय तर थोडे कष्ट पडतील, पण सगळे घरच्या घरी करण्याचा प्रयत्न जरूर करेन.

वास्तविक मी काही सुग्रण नाही. थोडेफार जमते. बऱ्याच वेळेस चुकते. पण घरातली कामं स्वतः करून, स्वैपाक स्वतः जमवणे, आणि स्वतः खाऊन दुसऱ्याला पण जेवू घालणे इतके जरी महिका शिकली, तर मी तिला काहीतरी चांगले "pass  on" केले, ह्याचा आनंद होईल मला!

Wednesday, 8 February 2017

भूभू ची गोष्ट

ही गोष्ट आज सकाळी महिकाने सांगितली:

एक भूभू असतो. तो जंगलमध्ये असतो. त्याचे आया-बाबा असतात. ते पण असतात जंगलमध्ये. त्याचे बाबा आणि भूभू बॉल खेळत असतात. आणि त्याची आया खुर्चीवर बसली असते. ते छान-छान बॉल खेळतात म्हणून आया clap clap करते.

खूप ऊन असतं. सूर्यमामा असतो ना! मग ते बॉल खेळात असतात. मग रात्र होते. मग ते तिघे असे झोपून जातात (झोपण्याची acting करून दाखवली!)

मग सकाळी उठतात. आणि तिघे पण स्कूलला जातात.

(गोष्ट एव्हढीच होती. बहुदा सकाळी शाळेत जायच्या आधी सांगितल्याने भूभूदेखील सकाळी उठून शाळेत जातो.)

Thursday, 2 February 2017

अगं आया, तेच तर मी म्हणत आहे

हल्ली महिका तिने बनवलेले जुने शब्द नाही वापरत. आणि आम्ही वापरले तर आम्हालाच शिकवते की तसं नाही
म्हणायचं.

काल अंघोळीला जाताना मी तिला म्हणाले, "चल गं, 'आंघॊन्ग' करायला."

"अगं आया, 'अंघोळ' म्हणतात, 'आंघॊन्ग' नाही."

महिका जेव्हा बोलायला लागली तेव्हा शब्द स्पष्ट नव्हते. काही यायचे नाहीत. काही शब्दांना तिने स्वतः काही वेगळे शब्दं बनवले होते. ते शब्द ऐकायला खूपंच गोड वाटायचे.

आता महिकाची शब्द संपदा वाढली आहे. ती सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित सांगू शकते. एखाद वेळेस एखादा शब्द येत नसेल आणि आपण तिला तो म्हणायला शिकवत असू, तेव्हा असा संवाद होतो:

"म्हण, संस्कृत."

"सन कुत"

"नाही. संस्कृत."

"अगं आया, तेच तर मी म्हणत आहे. सन कुत"

ह्या संवादात जी गम्मत आहे, तीच मजा होती तिच्या बोबड्या शब्दात. कालांतराने ते सर्व शब्द विसरले जातील. कोठेतरी नोंदून राहावेत ते शब्द म्हणून येथे लिहून ठेवत आहे.

आंघॊन्ग = अंघोळ
जिक्का, चीका = jacket (आता ती चीका म्हणजे लांब बाह्यांचे शर्ट अथवा फ्रॉक ह्या अर्थाने वापरते)
नन्ना = माऊ
बाळी = पाणी
टाटीस  = राक्षस
जेबण = जेवण
माळुस = माणूस
समा समा = सूर्य
चमन चमा = चंद्र
कप्पे = कपडे
आसीक = आईस क्रीम
चॉकोट = चॉकोलेटे 

Friday, 20 January 2017

ते काय खातात?

हा प्रश्न मला विचारला महिकाने. माहित आहे कोणाबद्दल? पोलीस!!!!

शाळेत जाताना एक पोलीस मामी गाडीवर दिसल्या. मग महिकाचे सर्व प्रश्न:


- कुठे जात आहेत? (मी: ऑफिस)

- पोलीस काय करतात? (मी: चोर पकडतात, ट्रॅफिक कंट्रोल करतात, आपल्याला मदत करतात)

- ऑफिस मध्ये काय करतात? मीटिंग करतात का? (मी: हो)

- मीटिंग काय करतात? (मी: आज काय काम करायचा ठरवतात, चोर कसे सापडवायचे ह्याचा विचार करतात.)

- चोर कुठे असतात? (मी: लपलेले असतात. आपल्याला नाही कळत. पोलिसांना कळत कोण चोर आहेत ते.)

- चोर कोण आहेत? सगळे चोर आहेत का? (इकडे तिकडे लोकांना दाखवत) हा माणूस, हा माणूस? (मी: नाही गं. कोणी नाहीत. असे सापडत नाहीत.)

- पोलीस काय खातात?

आता हा प्रश्न कमालीचा innocent असला, तरीही मला हसू आले. काय खातात बरं पोलीस??? पण महिकाला पटेल असे उत्तर द्यावे लागले...

मी: अगं आपल्यासारखेच खातात ते, चपाती, भाजी, वरण-भात.

ह्यावर अनेक प्रश्न:

- दूध पितात का?
- दही खातात का?
- काजू खातात का?
- chocolate काजू खातात का?

हे सर्व प्रश्न ऐकून मला भूक लागली!

सुदैवाने ह्या प्रश्नानंतर खाण्याचे प्रश्न संपले. मग तिने विचारले की पोलीस टोपी घालतात का?

हो म्हणाल्यावर लगेच पुढचा प्रश्न... कशी असते टोपी? मला दाखव ना!

थोड्याच अंतरावर एक पोलीस मामा दिसला आणि त्याच्या डोक्यावरची टोपी पण!

मलाच हूश वाटलं!!!

Wednesday, 18 January 2017

... मी आईची व्हावे आई

पर्वा कार चालवत घरी जाताना महिका म्हणाली, "आया, मी तुझी आया. मी कार चालवते."

"अच्छा, म्हणजे तू पुढे बसली आहेस आणि मी मांगे का?"

"हो, मी पुढे बसले आहे."

ह्या संवादामुळे मला "आई व्हावी मुलगी माझी, मी आईची व्हावे आई... " हेच गाणे आठवले. आणि विचारांची गाडी धावतच राहिली. मी कधी माझ्या आईची आई झाले का? झाले असेन... कधी तिला समजावताना, कधी तिला नवीन गोष्टी शिकवताना, कधी आजारी असताना काळजी घेताना.

उद्या महिका मोठी होईल. ती देखील असंच काही कमी जास्त प्रमाणात करेल. तेव्हा क्वचित तिला हे गाणं आठवेल!

Wednesday, 12 November 2014

For Common Cold

My girl recently suffered her first bout of cold. Thankfully with home-made recipes, I could control her cold immediately with no side effects. I am sharing the same recipe for everybody.

I have put this in Marathi because I don't know what those words are in English. Those that I know, I have put them in parentheses.

खारीक बी (seed of dried date)
वेखंड पावडर
लोखंड (anything made of iron)

हे तिन्ही सहाणेवर उगाळणे. हा लेप नाकावर आणि कपाळावर लावणे.

I have no idea what सहाण is in English.

Try this out. It works.