Tuesday, 14 March 2017

आया, तू किती छान जेवण करतेस...

हे उद्गार होते महिकाचे परवा मी पुरणपोळी बनवताना. आणि पुढे हेदेखील म्हणाली, "मलापण तुझ्यासारखं जेवण करायचंय!"

खरं सांगू का? मी किंचित गहिवरले... पण ह्याकरता नव्हे की खरंच माझे जेवण उत्कृष्ट झाले आणि तिला ते कळले!

मी ऑफिस सांभाळून जमेल तसे सगळे सण-वार करते. घरात दररोज पूजा नाही होत. पण सणासुदीला आवर्जून होते, सगळे सण अगदी कणा-रांगोळी काढणे इथपासून, त्या त्या दिवशी पक्वान्न बनवून नैवेद्य दाखवून सर्व जमवते. बऱ्याच वेळेस दमछाक होते. कंटाळा येतो, दमून जाते. वैताग येतो सगळे रीतिरिवाज करता करता.

पण त्या दिवशी महिका जे म्हणाली त्यामुळे एक लक्षात आलं की हे सर्व कुठेतरी "note down" होतंय नकळत. मुद्दाम बोलून न दाखवता आपले संस्कार रुजत आहेत. आणि आपल्या मुलीला आपल्यासारख्या गोष्टी कराव्याशा वाटतात, ह्यातच सगळे मिळाले.

कित्येक वेळेस मला सांगतात लोकं, "अगं काही इतका घाट घालत बसायचं नाही. सरळ बाहेरून ऑर्डर करायचं. हल्ली सगळं मिळतं." खरं आहे, मिळतं. पण तेव्हा मुलांकडून हे शब्द ऐकायला नाही मिळणार.

ज्यांना घरी करायला जमत नाही अथवा आवडत नाही त्यांच्याबद्दल माझे काही वाईट मत नाही, किंवा राग देखील नाही. मी आपलं स्वतःपुरतं सांगते. जितके जमेल तितके करेन. जेव्हा अवघड जाईल, तेव्हा मीदेखील बाहेरून आणेन. पण आत्ता जमतंय तर थोडे कष्ट पडतील, पण सगळे घरच्या घरी करण्याचा प्रयत्न जरूर करेन.

वास्तविक मी काही सुग्रण नाही. थोडेफार जमते. बऱ्याच वेळेस चुकते. पण घरातली कामं स्वतः करून, स्वैपाक स्वतः जमवणे, आणि स्वतः खाऊन दुसऱ्याला पण जेवू घालणे इतके जरी महिका शिकली, तर मी तिला काहीतरी चांगले "pass  on" केले, ह्याचा आनंद होईल मला!