Wednesday 8 February 2017

भूभू ची गोष्ट

ही गोष्ट आज सकाळी महिकाने सांगितली:

एक भूभू असतो. तो जंगलमध्ये असतो. त्याचे आया-बाबा असतात. ते पण असतात जंगलमध्ये. त्याचे बाबा आणि भूभू बॉल खेळत असतात. आणि त्याची आया खुर्चीवर बसली असते. ते छान-छान बॉल खेळतात म्हणून आया clap clap करते.

खूप ऊन असतं. सूर्यमामा असतो ना! मग ते बॉल खेळात असतात. मग रात्र होते. मग ते तिघे असे झोपून जातात (झोपण्याची acting करून दाखवली!)

मग सकाळी उठतात. आणि तिघे पण स्कूलला जातात.

(गोष्ट एव्हढीच होती. बहुदा सकाळी शाळेत जायच्या आधी सांगितल्याने भूभूदेखील सकाळी उठून शाळेत जातो.)

Thursday 2 February 2017

अगं आया, तेच तर मी म्हणत आहे

हल्ली महिका तिने बनवलेले जुने शब्द नाही वापरत. आणि आम्ही वापरले तर आम्हालाच शिकवते की तसं नाही
म्हणायचं.

काल अंघोळीला जाताना मी तिला म्हणाले, "चल गं, 'आंघॊन्ग' करायला."

"अगं आया, 'अंघोळ' म्हणतात, 'आंघॊन्ग' नाही."

महिका जेव्हा बोलायला लागली तेव्हा शब्द स्पष्ट नव्हते. काही यायचे नाहीत. काही शब्दांना तिने स्वतः काही वेगळे शब्दं बनवले होते. ते शब्द ऐकायला खूपंच गोड वाटायचे.

आता महिकाची शब्द संपदा वाढली आहे. ती सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित सांगू शकते. एखाद वेळेस एखादा शब्द येत नसेल आणि आपण तिला तो म्हणायला शिकवत असू, तेव्हा असा संवाद होतो:

"म्हण, संस्कृत."

"सन कुत"

"नाही. संस्कृत."

"अगं आया, तेच तर मी म्हणत आहे. सन कुत"

ह्या संवादात जी गम्मत आहे, तीच मजा होती तिच्या बोबड्या शब्दात. कालांतराने ते सर्व शब्द विसरले जातील. कोठेतरी नोंदून राहावेत ते शब्द म्हणून येथे लिहून ठेवत आहे.

आंघॊन्ग = अंघोळ
जिक्का, चीका = jacket (आता ती चीका म्हणजे लांब बाह्यांचे शर्ट अथवा फ्रॉक ह्या अर्थाने वापरते)
नन्ना = माऊ
बाळी = पाणी
टाटीस  = राक्षस
जेबण = जेवण
माळुस = माणूस
समा समा = सूर्य
चमन चमा = चंद्र
कप्पे = कपडे
आसीक = आईस क्रीम
चॉकोट = चॉकोलेटे